
खरीप हंगामासाठी बियाणे वाटप प्रक्रिया सुरू; महिला शेतकऱ्यांना ३०% प्राधान्य
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा; तूर-मूग-उडीद बियाण्यांवर अनुदान
‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, 11 जून (हिं.स.)।
खरीप हंगाम २०२६ साठी विविध शासकीय योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तिर्थकर यांनी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ प्रणालीद्वारे त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेतील तरतुदींनुसार पाच वर्षांच्या आतील वाणासाठी प्रति क्विंटल ६ हजार रुपये अनुदान, तर पाच ते दहा वर्षांच्या आतील वाणासाठी प्रति क्विंटल ३ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे केले जात असल्याने, या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी किमान ३० टक्के महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’चा वापर करून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. लाभार्थी निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, आपल्या परिसरातील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपकृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अर्जदार शेतकऱ्यांनी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असून, विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis