शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार बियाणे पोहोचवण्यासाठी संस्थांकडून अर्ज मागविले
खरीप हंगाम २०२६: तेलबिया बियाणे वितरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू १२ जून अंतिम मुदत; प्रमाणित बियाणे पुरवठादार संस्थांसाठी सुवर्णसंधी लातूर, 11 जून (हिं.स.)। खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्
शेतकरी


खरीप हंगाम २०२६: तेलबिया बियाणे वितरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

१२ जून अंतिम मुदत; प्रमाणित बियाणे पुरवठादार संस्थांसाठी सुवर्णसंधी

लातूर, 11 जून (हिं.स.)।

खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी लातूर जिल्हा कृषी विभागाने पात्र इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) आणि सहकारी संस्थांकडून प्रमाणित बियाणे पुरवठादार संस्था म्हणून अर्ज मागविले आहेत.

जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांनी आपले अर्ज दि. १२ जून २०२६ पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लातूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत प्रामुख्याने सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये ०५ वर्षांच्या आतील तसेच ५ ते ८ वर्षांच्या आतील अधिसूचित वाणांच्या बियाण्यांचा समावेश राहणार आहे.

बियाणे पुरवठादार संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी संबंधित संस्थेची ‘साथी’ पोर्टलवर नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. तसेच बियाण्यांची गुणवत्ता, उत्पादन कालावधी, उत्पादकांची नोंदणी, शासनाच्या बियाणे कायदे व नियमांचे पालन आणि इतर विहित अटींची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार व उगवणक्षम बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अधिसूचित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. बियाण्यांचे वितरण तालुकास्तरावर होणार असल्यामुळे संबंधित संस्थेकडे प्रत्येक तालुक्यात अधिकृत वितरक असणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

कृषी विभागाने पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी मुदतीत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande