
रायगड, 11 जून (हिं.स.)। : शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभागामार्फत प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या सर्वेक्षणासाठी रायगड जिल्ह्यात निवडलेल्या कुटुंबांकडे भेट देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने केले आहे. रोजगार-बेरोजगारीची स्थिती, कामगार सहभाग दर, उद्योगनिहाय रोजगाराची रचना, तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या, आर्थिक स्थिती, रोजगारनिर्मिती, उत्पन्न व खर्च यासंबंधी माहिती या सर्वेक्षणातून संकलित केली जाणार आहे. शासनाच्या विविध विकास योजना आणि धोरणनिर्मितीसाठी ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार असल्याचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी सांगितले.
या सर्वेक्षणाच्या क्षेत्रीय कामासाठी नियुक्त अन्वेषक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणासाठी पुणे व कोकण विभागाची विभागीय कार्यशाळा ५ ते १० जून २०२६ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत माहिती संकलनाच्या संकल्पना, व्याख्या आणि टॅबलेटद्वारे माहिती नोंदणीबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यात PLFS आणि ASUSE अंतर्गत एकूण ६ हजार ८२८ नमुना घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २७६ अन्वेषक व निरीक्षक त्यासाठी कार्यरत राहणार आहेत. पुणे व कोकण विभागात २ हजार ९५६ नमुना घटकांचे सर्वेक्षण ७५ अन्वेषक आणि २८ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे.
विकसित भारत २०४७ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी अचूक व अद्ययावत माहिती आवश्यक असून, या सर्वेक्षणातून मिळणारी सांख्यिकीय माहिती रोजगार, उद्योग आणि विकासविषयक धोरणे ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)