
अमरावती, 11 जून (हिं.स.)।
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर देशमुख यांनीही तितक्याच आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे.
नागपूरमधील खासगी रुग्णालयातूनच माध्यमांशी संवाद साधताना देशमुख यांनी थेट यशोमती ठाकूर यांच्यावरच भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे.
मी मॅनेज होणारा माणूस नाही
हर्षजित देशमुख म्हणाले की, माझी प्रकृती बिघडल्यामुळे मी रुग्णालयात दाखल आहे. मात्र, माझ्या तब्येतीची विचारपूस न करता माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. मला भेटायला काँग्रेसचे मोजकेच नेते आले. माझी तब्येत कशी आहे, याची माहितीही घेतली नाही आणि थेट आरोप सुरू झाले. मी मॅनेज होणारा व्यक्ती नाही. उलट यशोमती ठाकूरच भाजपला मॅनेज झाल्या असाव्यात. त्यांना काँग्रेसचे नुकसान करून भाजपला फायदा करून द्यायचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून देशमुख निवडणुकीतून माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही. मी अजूनही काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे. पक्षाने पुढे काय निर्णय घ्यायचा तो घेईल, पण मी मैदानात कायम आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, माझा मतदारांशी संपर्क सुरू आहे. सध्या डिजिटल माध्यमातून प्रचार करत आहे. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर अमरावतीत जाऊन प्रत्यक्ष प्रचार करणार आहे.
देशमुखांच्या आरोपांना उत्तर देताना यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच निशाणा साधला. जर तुम्ही खरोखरच निवडणूक लढवत असाल तर रुग्णालयातून बाहेर या आणि मैदानात उतरा. निवडणुकीला अवघे चार-पाच दिवस राहिले आहेत. हॉस्पिटलमध्ये बसून नाटक करण्यापेक्षा मतदारांमध्ये जा, असे त्या म्हणाल्या.त्यांनी पुढे म्हटले की, देशमुख यांची सर्व वक्तव्ये भाजपला फायदा होईल अशीच आहेत. डिजिटल माध्यमातून प्रचार करतोय हे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी प्रत्यक्ष प्रचार करून दाखवावा.अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हर्षजित देशमुख अचानक संपर्काबाहेर गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ते नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी देशमुख हे 15 ते 20 कोटी रुपये घेऊन मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा दावा केला. तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी