
नाशिक, 11 जून, (हिं.स.)। मौजे सावरगाव येथे धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आज दुपारी सुमारे चार वाजून दहा मिनिटांनी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. फिरण्यासाठी गेलेले चार जण पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यामध्ये सातत्याने धरणपरिक्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे
मागील काही दिवसापासून विद्यार्थ्यांना असलेल्या सुट्टी आणि पालकांचा मुलांना थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी असलेला प्रयत्न यामुळे नदी आणि धरण किनारी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या ही वाढत आहे अगदी पंधरा दिवसापूर्वी नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यासह शेजारील दोन मुलं फिरायला गेलेली होती ती देखील गंगापूर धरणावरती बुडाल्याची घटना ताजी असतानाच मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील अशीच घटना घडली होती.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे जण दुपारच्या सुमारास धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा अचानक तोल जाऊन ते खोल पाण्यात गेले आणि ही दुर्घटना घडली.या घटनेत खालील चार जणांचा मृत्यू झाला आहे: गणेश सुरेश गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव), साहिल मनोहर गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव), निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६ वर्षे, रा. सावरगाव) आणि मयुरी पवन जाधव (वय २१ वर्षे, रा. तळेगाव अंजनेरी).स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले आणि चारही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.या दुर्घटनेमुळे सावरगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV