
नंदुरबार, 11 जून (हिं.स.) : अंधश्रद्धा, जादूटोणा आणि अघोरी प्रथांचे समाजातून उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. ही कार्यशाळा ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, 2013’ या कायद्यावर आधारित होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी तसेच सरकारी अभियोक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीचे सरकारी अभियोक्ता भाईदास बिरारे यांनी कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अंधश्रद्धा, जादूटोणा, नरबळी, भूतबाधा, अघोरी उपचार आणि महिलांना ‘चेटकीण’ ठरवून होणाऱ्या अत्याचारांविरोधातील तरतुदींवर प्रकाश टाकला.
त्यांनी स्पष्ट केले की, हा कायदा समाजातील फसवणूक, अज्ञान आणि भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या प्रथांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अशा घटनांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी आभार मानून कार्यशाळेची सांगता केली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर