घटसर्प-फऱ्या आजारांवर नियंत्रणासाठी राज्यात पशुधन लसीकरण मोहीम वेगात
रायगड, 11 जून (हिं.स.) | अलिबाग : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभर वेगाने सुरू केली आहे. या मोहिमेमुळे पशुधनाचे आरोग्य जपणे
Livestock-vaccination-accelera


रायगड, 11 जून (हिं.स.) | अलिबाग : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभर वेगाने सुरू केली आहे. या मोहिमेमुळे पशुधनाचे आरोग्य जपणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

पावसाळ्यापूर्वी होणारे घटसर्प आणि फऱ्या यांसारखे घातक आजार रोखण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. लसींचा प्रभाव टिकून राहावा यासाठी राज्यस्तरापासून ग्रामीण उपकेंद्रांपर्यंत शीतसाखळी व्यवस्थापन काटेकोरपणे पाळले जात असून अद्ययावत कोल्ड बॉक्सच्या सहाय्याने लसींची सुरक्षित वाहतूक केली जात आहे.

या मोहिमेसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके गावागावांत जाऊन डोअर-टू-डोअर पद्धतीने जनावरांचे लसीकरण करत आहेत. कोणतेही जनावर लसीकरणाविना राहू नये यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो, असे नमूद करत डॉ. किरण पाटील यांनी शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांचे वेळेवर लसीकरण करून संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे. यासाठी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.यंदाच्या मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाची पारदर्शक डिजिटल नोंदणी. प्रत्येक जनावराला लस दिल्यानंतर त्याची नोंद भारत पशुधन प्रणाली (NDLM Portal) वर तात्काळ केली जाणार आहे. तसेच प्रत्येक जनावराला 12 अंकी टॅग लावून नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून यामुळे मोहिमेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि बोगस नोंदींना आळा घालणे शक्य होणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande