
रायगड, 11 जून (हिं.स.) : राज्यातील गायवर्गीय पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून संरक्षण देण्यासाठी सन 2026-27 या वर्षासाठी गोटपॉक्स लसींचे उत्पादन पुणे येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेत सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वितरण सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी ही लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील 21 व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय गायवर्गीय पशुधनाच्या संख्येनुसार लस वितरणाचे नियोजन करण्यात आले असून, एकूण उत्पादनाच्या सुमारे 40 टक्के लसमात्रांचे वाटप केले जात आहे.
लम्पी चर्मरोगामुळे पशुधनाचे आरोग्य तसेच दुग्धउत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील संस्थेने आवश्यक लसमात्रांचे यशस्वी उत्पादन पूर्ण केले आहे.
जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकाऱ्यांना लस पुरवठा वेळेत आणि शीत साखळी (कोल्ड चेन) अबाधित ठेवून क्षेत्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लस प्राप्त होताच अधिक दूध देणाऱ्या आणि उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहिमेचा दैनंदिन अहवाल दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत विभागनिहाय सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथील सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत.
दरम्यान, पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लम्पी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांनीही लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)