वरळी म्युझिक कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ‘सनबर्न’ व प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
* नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथील आंदोलनात जोरदार मागणी * ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घाला ! मुंबई, 11 जून (हिं.स.) : गोरेगावमधील नेस्को (NESCO) येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झ
आंदोलन


* नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने दादर येथील आंदोलनात जोरदार मागणी

* ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घाला !

मुंबई, 11 जून (हिं.स.) : गोरेगावमधील नेस्को (NESCO) येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झालेला मृत्यू ते शिवडीच्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हलपर्यंत पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच आता वरळीच्या हाय-प्रोफाइल ‘आउटवर्ल्ड’ म्युझिक कॉन्सर्टमध्ये आणखी एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. वरळी येथील ‘एनएससीआय’ (NSCI) डोममध्ये तरुणाचा मृत्यू आणि एक तरुणी बेशुद्ध पडणे, हे राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचे भयानक वास्तव आहे. शिवडी आणि वरळी येथील दोन्ही कार्यक्रमांचे मुख्य आयोजक ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजक व त्यांचे स्थानिक भागीदार ‘स्टार स्टेज इव्हेंट्स’ आणि ‘ई व्हेंचर एक्स’ असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी वरळी येथील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर सनबर्नच्या आयोजकांवर आणि त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट प्रशासनावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात कायमची बंदी घालण्याची मागणी नशा विरोधी संघर्ष अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे. यादृष्टीने 'नशा विरोधी संघर्ष अभियाना'च्या वतीने 11 जून रोजी दादर रेल्वे स्टेशनबाहेर जनआंदोलन करण्यात आले. यावेळी युवक, राष्ट्रप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

वरळी येथील या संगीत सोहळ्याला सुरुवातीला कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली होती; परंतु नंतर वरिष्ठ पातळीवरून चक्रे फिरल्यावर ही परवानगी मिळाली असेल, तर ही गंभीर बाब आहे. यापूर्वी शिवडी येथे आयोजित केलेल्या सनबर्न फेस्टिव्हलमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता आणि युवा पिढीने त्याला रस्त्यावर उतरून तीव्र विरोध केला होता; मात्र प्रशासनाने त्यावेळी कोणतीही ठोस कारवाई न करता या वादग्रस्त कार्यक्रमांना अभय दिले. गोव्यातील ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे अनेक तरुणांचे मृत्यू झाल्याचा काळाकुट्ट इतिहास आणि हिंदु जनजागृती समितीसह विविध संघटनांचे अनेक वर्षांपासून आक्षेप प्रशासनाला लेखी स्वरूपात अवगत केलेले असतांनाही केवळ पैशापुढे लोटांगन घालून गोरेगाव आणि वरळी येथे या मृत्यूच्या पार्ट्यांना जाणीवपूर्वक पायघड्या का घातल्या गेल्या, याचे उत्तर आता पोलीस व प्रशासन यांना द्यावेच लागेल, असे 'नशा विरोधी संघर्ष अभियाना'च्या वतीने सौ.धनश्री केळशीकर यांनी आंदोलनात संबोधित करताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये केवळ पैशाच्या जोरावर तरुण पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलून राज्याला पंजाबच्या धर्तीवर ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचा हा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदार, भ्रष्ट आणि असंवेदनशील कारभारामुळे ज्या कुटुंबातील तरुण मुले मृत्युमुखी पडली आहेत, त्या पालकांची कधीही न भरून निघणारे नुकसान प्रशासन कशाप्रकारे भरून देणार आहे, याचे उत्तरही प्रशासनाने द्यावे, असा प्रश्न आंदोलनात सहभागी उपस्थित मान्यवर आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून करण्यात आला.

वरळी येथील ‘एनएससीआय’ (NSCI) डोम ही मुंबई महानगरपालिकेची म्हणजेच शासकीय जागा असतांनाही तिथे तरुण पिढीला उध्वस्त करणाऱ्या अशा घातक पार्ट्यांचे आयोजन कसे काय होऊ दिले जाते? त्यामुळे महापालिकेने ज्यांना हे डोम भाड्याने चालवण्यासाठी दिले आहे, त्या कंत्राटदारांवर आणि संबंधित व्यवस्थापनावर शासन काय कठोर कारवाई करणार आहे ? याचे उत्तर तातडीने मिळाले पाहिजे. जोपर्यंत तरुणांच्या रक्ताने हात माखलेल्या या ‘सनबर्न’वर आणि दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही. छत्रपती शिवरायांच्या भूमीत पाश्चात्त्य ड्रग्ज विकृतीचे उदात्तीकरण व पार्ट्यांचा नंगानाच करणारे असे विघातक कार्यक्रम शासकीय पातळीवर तात्काळ बंद झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे, असेही 'नशा विरोधी संघर्ष अभियाना'च्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande