
मुंबई, 11 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. एनडीएच्या बैठकीसाठी मंगळवारी दिल्लीला रवाना होताना हा प्रकार घडला. सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानाचे उड्डाण तात्पुरते थांबवण्यात आल्याने त्यांच्या प्रवासाला सुमारे 45 मिनिटांचा विलंब झाला. दरम्यान या घटनेवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेय.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी त्या मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होणार होत्या. विमानात तांत्रिक समस्या आढळल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि तांत्रिक पथकाने तातडीने तपासणी सुरू केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि त्याच दिवशी त्यांचा दिल्लीकडे प्रवास पूर्ण करण्यात आला.या प्रवासात पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील सहभागी असल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्या प्रवासालाही या तांत्रिक अडचणीमुळे थोडा विलंब झाला. यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये सुनेत्रा पवारांचे पती व तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातातनिधन झाले होते. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक खराबीचे वृत्त बाहेर येताच चिंता निर्माण होऊन चर्चेला पेव फुटले.
दरम्यान, या घटनेनंतर खासगी विमानांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. विमान प्रवासातील नियमित तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रवासाबाबत निर्माण झालेल्या चर्चांवर सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण देताना, संबंधित प्रवास पूर्णपणे सुरक्षितरीत्या पार पडल्याची माहिती देण्यात आली असून कोणत्याही टप्प्यावर मोठी अडचण उद्भवली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी