
पुणे, 11 जून (हिं.स.)।
दिल्लीतील आंदोलनानंतर आता पुण्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. मात्र आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला विद्यापीठ प्रशासनाने काही अटी व शर्तींसह परवानगी दिली होती. NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “नरेंद्र मोदी उत्तर द्या”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना काही तरुण आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते. तसेच आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी आयोजकांकडूनही सहभागी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु