
नंदुरबार, 11 जून (हिं.स.) : नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी तसेच हक्कांचे संरक्षण आणि तातडीने न्याय मिळवण्यासाठी शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘महिला लोकशाही दिन’ आयोजित केला जातो.
यानुसार चालू महिन्यात सोमवार, 15 जून 2026 रोजी दुपारी 1:00 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृह येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी दिली आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश पीडित महिलांच्या तक्रारी आणि अडचणी शासकीय यंत्रणेमार्फत तातडीने सोडवणे तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे.
महिला लोकशाही दिनात तक्रार नोंदवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:
तक्रारदार महिलांनी आपले अर्ज घेऊन 15 जून रोजी दुपारी 1:00 वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहावे.
ज्या महिलांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, त्या https://meet.google.com/pnz-pxru-pbd या गुगल मीट लिंकद्वारे दुपारी 1:00 ते 2:00 या वेळेत ऑनलाइन सहभागी होऊन तक्रार मांडू शकतात.
या दिनामध्ये केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जातील. न्यायालयीन प्रकरणे, आस्थापना विषयक तसेच सामूहिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
हा उपक्रम महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर