लातूरमधील 'त्या' शेतकऱ्याला मिळणार नवीन बैल, मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई, 12 जून (हिं.स.) - लातूर जिल्ह्यातील बोंबळी गावचे (ता. देवणी) शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना शासकीय मदतीचा भाग म्हणून मिळालेला बैल आजारी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमं

मुख्यमंत्री


मुंबई, 12 जून (हिं.स.) - लातूर जिल्ह्यातील बोंबळी गावचे (ता. देवणी) शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना शासकीय मदतीचा भाग म्हणून मिळालेला बैल आजारी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना सूचना दिल्या की, त्यांनी काशीनाथ गायकवाड यांना बाजारात घेऊन जावे आणि त्यांच्या पसंतीचा नवीन बैल विकत घेऊन द्यावा. आता या शेतकऱ्याला लवकरच नवीन बैल मिळण्याची अपेक्षा आहे.

वास्तविक, शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज पडून दगावला होता. त्यानंतर, बैलाच्या जागी स्वतःची पत्नी हौसाबाई हिला नांगराला जुंपून ते शेती करताना दिसले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यातून राज्यभरातून त्यांच्याबद्दल सहानुभूती व चिंता व्यक्त केली गेली. या प्रकरणाची दखल घेत, सरकारने १० जून रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्याला तात्काळ मदत म्हणून एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र, शेतात नांगरणी करत असताना तो बैल अचानक खाली बसला आणि नंतर तो आजारी असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी प्रशासनाने त्याला आजारी बैल दिला आणि त्यामुळे त्याला पशुवैद्यकीय उपचारांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागला, असे आरोप होऊ लागले. विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संस्थांनी या घटनेला प्रशासकीय निष्काळजीपणाचे उदाहरण ठरवत सरकारवर टीका केली. दरम्यान आज, शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारले. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी लातूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली होती. काशीनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतकरी असून ते इतरांची जमीन 'बटाई'वर (हिश्श्याने) कसतात. आपला एक बैल दगावल्यानंतर, शेतीची कामे करण्यासाठी त्यांना आपली पत्नीच नांगराला जुंपणे भाग पडले होते. मुख्यमंत्री म्हणाले, त्या घटनेनंतर, मी जिल्हा प्रशासनाला तात्काळ सूचना दिल्या होत्या की मृत बैलाची भरपाई द्यावी आणि मदतीसाठी दुसरा बैल उपलब्ध करून द्यावा. मात्र, नंतर असे निदर्शनास आले की दिलेला बैल योग्य नव्हता. त्यामुळे, मी आज जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी शेतकऱ्याला बाजारात घेऊन जावे आणि त्यांच्या पसंतीचा एक धडधाकट बैल विकत घेऊन द्यावा. मुख्यमंत्री महोदयांच्या या निर्देशामुळे शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना लवकरच एक नवीन आणि धडधाकट बैल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande