
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात मोठी घोषणा
नागपूर, 13 जून (हिं.स.) : केंद्रातील मोदी सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इंधन क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशातील वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि आयातमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना अधिकृत मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली.
गडकरी यांनी सांगितले की, 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंजिन वाहनांसंदर्भातील ऐतिहासिक आदेशावर काल स्वाक्षरी करण्यात आली. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल उद्योगात पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे.याचबरोबर, पिकांचे अवशेष आणि बांबूपासून तयार होणाऱ्या बायो-एव्हिएशन फ्युएलचे दर सरकारने अधिकृतपणे निश्चित केल्याची घोषणाही त्यांनी केली. या निर्णयामुळे विमान वाहतूक क्षेत्राला जागतिक इंधन दरांतील चढ-उतारांपासून संरक्षण मिळणार असून, पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरालाही चालना मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या प्राइस स्टॅबिलायझेशन योजनेअंतर्गत विमान इंधनाचा प्रभावी दर प्रति लिटर सुमारे 115 रुपये निश्चित करण्यात आला आहे. या योजनेचा स्वीकार करणाऱ्या विमान कंपन्यांना पुढील तीन वर्षे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तरी याच स्थिर दराने इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.गडकरी यांनी सांगितले की, या धोरणामुळे विमान इंधनाचा खर्च नियंत्रित राहील आणि विमानांमध्ये बायो-इंधनाचे मिश्रण वाढविणे अधिक सुलभ होईल. यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होण्यासोबतच देशाच्या ऊर्जा सुरक्षेलाही बळकटी मिळेल.
विमानात शेतकऱ्यांच्या कचऱ्यापासून तयार इंधन
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 25 जून रोजी अधिकृतपणे जीएमआर कंपनीकडे हस्तांतरण होणार असल्याची माहिती देताना गडकरी यांनी एक महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला. विमानतळ पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर येथून उड्डाण करणाऱ्या पहिल्या विमानात शेतकऱ्यांच्या शेतीतील अवशेषांपासून तयार करण्यात आलेले बायो-एव्हिएशन फ्युएल वापरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.शेतकरी आता केवळ अन्नदाता नसून ऊर्जादाताही बनला आहे. या उपक्रमामुळे भारतीय शेतकऱ्यांची ऊर्जा निर्मितीतील भूमिका जगासमोर अधोरेखित होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
इथेनॉल-आधारित वाहने आणि जैव-इंधनाला प्रोत्साहन देणारे हे निर्णय देशातील प्रदूषण कमी करण्यास, पेट्रोल-डिझेल आयातीवरील खर्च घटविण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी