लातूरातील चोला फायनान्सचा मॅनेजर फरार; ग्राहकांचे ईएमआयचे लाखो रुपये गायब
लातूर, 13 जून (हिं.स.)। लातूर शहरातील चोला मंडलम फायनान्स कंपनीतील एका मॅनेजरच्या कथित गैरव्यवहारामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांकडून भरलेले ईएमआयचे लाखो रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता परस्पर हडप के
चोला फायनान्स


लातूर, 13 जून (हिं.स.)।

लातूर शहरातील चोला मंडलम फायनान्स कंपनीतील एका मॅनेजरच्या कथित गैरव्यवहारामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्राहकांकडून भरलेले ईएमआयचे लाखो रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचा आरोप संबंधित मॅनेजरवर करण्यात आला असून, तो सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, कंपनीतील एका कर्मचाऱ्याची बदली थांबवून देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने चोला मंडलम फायनान्सकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही संबंधित ग्राहकाने पत्नीचे सोनं गहाण ठेवून कर्जाचे सहा हप्ते नियमितपणे भरले. मात्र, कंपनीच्या नोंदी तपासल्यानंतर या हप्त्यांची कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित मॅनेजरने ग्राहकांकडून घेतलेली रक्कम परस्पर अपहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, याच कंपनीतील एका कर्मचाऱ्याला बदली थांबवून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या दोन्ही प्रकारांमुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित ग्राहक, संबंधित कर्मचारी तसेच उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोला फायनान्सच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. संबंधित मॅनेजरवर तात्काळ कठोर कारवाई करून ग्राहकांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावर कंपनी प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande