
लातूर, 13 जून (हिं.स.)।
हेल्मेट घाला, जीवन वाचवा हा संदेश पुन्हा एकदा वास्तवात उतरला असून हेल्मेटच्या वापरामुळे एका पोलीस अमलदाराचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस स्टेशन रेणापूर येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार विश्वास जाधव हे शुक्रवार (दि. १२ जून २०२६) रोजी आपले नियमित कर्तव्य पार पाडून रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून रेणापूरहून लातूरकडे जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा इंडिका (MH 12 HV 7633) या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात विश्वास जाधव हे रस्त्यावर फेकले गेले. सुदैवाने त्यांनी हेल्मेट परिधान केले असल्याने त्यांच्या डोक्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात त्यांच्या कोपराला किरकोळ जखम झाली असून ते सुरक्षित आहेत. हेल्मेटमुळेच या जीवघेण्या अपघातातून त्यांचा बचाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लातूर पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले होते.
याशिवाय, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करून त्याची नोंद सेवापुस्तकात करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिल्या होत्या. या सूचनांमुळे पोलीस दलात हेल्मेट वापराबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे.
दरम्यान, विश्वास जाधव यांच्या अपघाताच्या घटनेने हेल्मेटचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. एका हेल्मेटमुळे केवळ एका कर्तव्यदक्ष पोलीस अमलदाराचा जीवच वाचला नाही, तर एका कुटुंबालाही मोठ्या संकटापासून संरक्षण मिळाले आहे.
नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis