
नांदेड, 13 जून, (हिं.स.)। राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' राबविले जाणार असून, १ ते १५ जून दरम्यान त्याची पूर्वतयारी केली जात आहे. ५ वर्षांखालील बालकांमध्ये अतिसारामुळे (डायरिया) होणारे बालमृत्यू शून्य करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवकांमार्फत घराघरांमध्ये ओआरएस (ORS) आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जाईल. या मोहिमेला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भिंतीपत्रके, दवंडी, सोशल मीडिया आणि मेळाव्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी दिली आहे.
इतर आरोग्य विषयांचा आढावा:
पल्स पोलिओ व अतिसार मोहिमेसोबतच बैठकीत नियमित लसीकरण (Routine Immunization), आयडीएसपी (IDSP-एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम), एचपीव्ही (HPV-गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लस) आणि एचआयव्ही (HIV) प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय ठेवून सूक्ष्म आराखड्यानुसार काम करण्याचे आणि रेल्वे स्टेशन, बस स्थानके व चेकपोस्टवर ट्रान्झिट टीमच्या माध्यमातून एकही बालक डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व माता-पित्यांनी आपल्या ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना २८ जून रोजी पोलिओ बूथवर नेऊन डोस पाजावा व राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी केले आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis