
मुंबई, 13 जून (हिं.स.) - मागील अनेक दिवसांपासून राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी देखील अनेकदा बोलताना ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला आहे. मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत का याची आता चर्चा सुरू झाली आहे.
मध्यंतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. नागेश पाटील आष्टीकरांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर खासदार संजय पाटील यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूसही एकनाथ शिंदेंकडून करण्यात आली होती.
केवळ अफवा पसरविण्याचा व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - खा. नागेश पाटील-आष्टीकर
ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे सांगून केवळ अफवा पसरविण्याचा व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून काहीच होत नाही, हे आपण बघितलेले आहे. अशा प्रकारच्या अफवा महिन्या-दोन महिन्यानंतर पसरविण्याचे काम केले जात आहे. त्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. आमचे नेते उद्धव ठाकरे यांना सर्वच गोष्टी माहित आहेत. सत्ताधारी मंडळींकडून कोणत्या तरी विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अशास्वरूपाच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी स्पष्ट केले. नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नागेश पाटील-आष्टीकर यांनी ऑपरेशन टायगरची हवाच काढली. त्यासोबतच नांदेड विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असल्याचे सांगत एकीकडे महायुतीची धाकधूक वाढवली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील-आष्टीकर यांना उतरविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी