


* डिजिटल प्रशासन आणि नागरिक सेवा वितरणातील उत्कृष्टतेसाठी कडेपूर ग्रामपंचायत (जि. सांगली) आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचा गौरव
नवी दिल्ली, 13 जून (हिं.स.) - ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने मानाचे स्थान मिळवले आहे. डिजिटल प्रशासन आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरवण्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी, महाराष्ट्रातील पंचायती राज विभागाशी संबंधित दोन उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला 'सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम' या श्रेणीमध्ये सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे.
या ग्रामपंचायतीने एक सर्वसमावेशक 'एंड-टू-एंड' डिजिटल प्रशासन व्यवस्था उभी केली असून, तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण प्रशासनाचे एक आदर्श उदाहरण म्हणून ती समोर आली आहे. पूर्णपणे कागदविरहित ई-ऑफिस प्रणाली राबवणारी ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली असून, याद्वारे 4,321 लाभार्थ्यांना 1,355 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा देण्यात आल्या आहेत. तसेच, एकात्मिक डिजिटल पेमेंट प्रणालीचा अवलंब केल्यामुळे महसूल संकलनात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे.
नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पकतेने वापर करत कडेपूर ग्रामपंचायतीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आठ वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सची अंमलबजावणी केली आहे. यामध्ये ग्रामपंचायत बैठकांचे संक्षिप्त सारांश तयार करणे, विविध शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थी ओळखणे, शासन निर्णय शोधून काढणे, प्रशासकीय कामांसाठी 'स्मार्ट नोटिंग' तयार करणे, माहितीचे अचूक विश्लेषण करणे आणि माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वयंचलित पद्धतीने तयार करणे अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे गावपातळीवरील प्रशासकीय कामांचा वेग तर वाढलाच, शिवाय नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही मोठी सुधारणा झाली आहे.
त्याचबरोबर, 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व डिजिटल दस्तऐवज आणि नोंदी सुरक्षित व फेरफारमुक्त ठेवण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. 'जीआयएस' तंत्रज्ञानावर आधारित मॅपिंगद्वारे गावातील 309 नवीन घरांचे जिओ-टॅगिंग (भौगोलिक स्थान निश्चिती) करण्यात आले, ज्यामुळे घरपट्टीतून मिळणाऱ्या महसुलात सुमारे 7.5 लाख रुपयांची भर पडली आहे.
'मेरी पंचायत' ॲपच्या माध्यमातून कडेपूर ग्रामपंचायतीने नागरिकांच्या 1,736 तक्रारींचे 100 टक्के वेळेत आणि यशस्वी निवारण केले आहे. याशिवाय, 'निर्णय' ॲपद्वारे ग्रामसभेच्या सर्व 60 बैठकांचे पूर्वनियोजन करण्यात आले; ज्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामसभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या आणि त्यांचे योगदान संपूर्ण देशात सर्वाधिक नोंदवले गेले आहे.
विशेष म्हणजे, ई-गव्हर्नन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, नॅनो-टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अधिकृतपणे धोरणे मंजूर करणारी ही भारतातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. तंत्रज्ञानाचा हा सुनियोजित आणि भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन कडेपूर ग्रामपंचायतीला तळागाळातील प्रशासनात देशात अग्रेसर बनवतो.
राज्यासाठी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी म्हणजे, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यांच्या 'ई-आरोग्य धमणी' (e-Aarogya Dhamni – Transforming Healthcare through e-Governance) या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी 'जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स उपक्रम' श्रेणीअंतर्गत सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सुलभता आणि गतिशीलता वाढवून, या कार्यक्रमाने मूलभूत आरोग्य सुविधा आणि सुप्रशासन खऱ्या अर्थाने वंचित व गरजू घटकांच्या दारापर्यंत पोहोचवले आहे.
या पुरस्कारांचे वितरण 1 आणि 2 जुलै 2026 रोजी राजस्थान मध्ये जयपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 29 व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेमध्ये करण्यात येणार आहे. सुवर्ण पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि लोककल्याणकारी उपक्रमांना अधिक बळकट करण्यासाठी 10 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर कडेपूर ग्रामपंचायत आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला मिळालेला हा सन्मान, तळागाळातील प्रभावी प्रशासन, उत्कृष्ट सेवा वितरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची महाराष्ट्राची वचनबद्धता दर्शवतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी