
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)।
पवित्र पुरुषोत्तम मासानिमित्त बदनापूर येथे आयोजित करण्यात आलेला भव्य संत पूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील संत-महंत, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान श्री पांडुरंगाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. पुरुषोत्तम मास हा भक्ती, साधना, दानधर्म आणि आत्मचिंतनाचा पवित्र कालखंड मानला जातो. या पवित्र पर्वानिमित्त आयोजित संत पूजन सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले.
यावेळी ह.भ.प. पंढरीनाथ नाना तावरे महाराज, परमपूज्य पवन भारती खंडेश्वरी बाबा, आत्मानंद स्वामी महाराज (श्री दत्त संस्थान, ताडहादगाव), ह.भ.प. किसन महाराज काजळकर, ह.भ.प. केदारनाथ महाराज टेकाळे (पांगरखेडा), ह.भ.प. संतोष महाराज आढावणे, महंत शेवलीकर मोठे बाबा महानुभाव आश्रम बदनापूर, शालिगिरी १००८ भोले बाबा, गायत्री दीदी (दत्ताश्रम, रामनगर तांडा) ह भ प नामदेव महाराज शिंदे देवमूनेश्वर संस्थान देमणी वाहेगाव, शिवाजी महाराज शिंदे, रमेश महाराज लहाने, प्रल्हाद महाराज कान्हेरे, दादा महाराज पाटील , गजानन महाराज देठे, बाबासाहेब महाराज शिंदे,तसेच उपस्थित सर्व संत-महंतांचे पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन पूजन करण्यात आले. यावेळी संतांच्या पवित्र हस्ते आशीर्वाद घेण्याचा लाभ मिळाला.
संतांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजात सदाचार, संस्कार, सेवा, भक्ती आणि मानवतेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. संतांचा सहवास हा समाजाला योग्य दिशा देणारा असून त्यांच्या विचारांमधून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असते. संतांच्या कृपाशीर्वादामुळे समाजात शांतता, एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत होतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
पुरुषोत्तम मासाच्या या पुण्यपर्वात संतांचे दर्शन, पूजन व आशीर्वाद घेण्याचा योग लाभणे ही अत्यंत भाग्याची बाब असून या सोहळ्यामुळे उपस्थित भाविकांच्या मनात भक्तीभाव अधिक दृढ झाला. संतांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती लाभो.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis