
मालेगाव, 15 जून (हिं.स.)।
औरंगाबाद आमच्या मनात आणि हृदयात आहे, त्यामुळे आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही, असे वक्तव्य करणारे 'इस्लाम पक्षा'चे संस्थापक आसिफ शेख हे निव्वळ देशद्रोही आहेत, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. मालेगावात आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिक भाजप नेत्यांनी आसिफ शेख यांची भूमिका राष्ट्रविरोधी असल्याचे ताशेरे ओढले आहेत.
आसिफ शेख यांनी संभाजीनगर येथे एका पक्षीय कार्यक्रमात बोलताना संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असा केला होता. तसेच कागदोपत्री काहीही नामकरण झाले तरी आमच्या मनात व हृदयात या शहराचे नाव औरंगाबाद असेच राहील, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, महानगरप्रमुख देवा पाटील, लकी गिल, दादा जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी मालेगाव पत्रकार परिषदेत आसिफ शेख यांच्या जुन्या आणि सध्याच्य वक्तव्यांचा समाचार घेत आक्रमक भूमिका मांडली.
नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील एक संशयीत दानिश शेख याला आसिफ शेख यांच्या इस्लाम पक्षाने न्यायालयात स्वतंत्र वकील देऊन कायदेशीर पाठबळ दिले आहे. टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतरण करण्याच्या गंभीर प्रकरणात आरोपींची बाजू घेत कायदेशीर मदत पुरवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेब, टिपू सुलतानची तरफदारी करून आसिफ शेख हे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला.
औरंगाबादचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय संविधानिक पध्दतीने झाला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करणाऱ्या शेख यांना संविधान मान्य नाही का, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. आसिफ शेख यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, याकडे भाजप नेत्यांनी लक्ष वेधले. मागे एकदा बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात मदत छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. मालेगावातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर त्यांनी अतिक्रमणधारकांची बाजू घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देणाऱ्यांचा शेख हे उदोउदो करीत असतात. औरंगजेब, अफजल खान हे राष्ट्रविरोधी होते. त्यामुळे त्यांची तरफदारी करणारे शेख हे देखील देशद्रोही ठरतात, अशी टीका करत शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आग्रह भाजपतर्फे धरण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV