
पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन; पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.) : केंद्रातील मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या निमित्ताने रेणुका माता गड, सोमठाणा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश मान्यवरांनी दिला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा महासचिव प्रवीणजी घुगे, अनिल कोलते पाटील, बद्रीनाथ पठाडे, सतीश नागरे, वसंतराव जगताप, भगवान मात्रे, भगवान बारगाजे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा हा संकल्प करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis