
लातूर, 15 जून (हिं.स.) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळितधान्य) 2026-27 अंतर्गत फ्लेक्झी फंड घटकातील विविध योजनांसाठी लातूर जिल्ह्यात गोदाम बांधकाम, तेलघाणा युनिट्स तसेच मिनी ऑइल मिल व एक्सपेलर घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, वैयक्तिक लाभार्थी तसेच नोंदणीकृत उद्योग व समूह आधारित व्यवसाय संस्थांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. विशेषतः सोयाबीन मूल्यसाखळी भागीदारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अंदाजे ₹28.80 लाख खर्च अपेक्षित असून त्यावर 50 टक्के किंवा कमाल ₹14.40 लाख इतके अनुदान अनुज्ञेय राहील. या घटकासाठी लातूर जिल्ह्याला तीन गोदामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत अर्जदारांनी रिझर्व्ह बँकेच्या मान्यताप्राप्त वित्तीय संस्थांकडून बँक कर्ज घेऊन प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 असून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेलघाणा) घटकांतर्गत 10 टन प्रतिदिन क्षमतेच्या तेल काढणी युनिट्ससाठी (डिहलर, सीड क्लिनर, तेल काढणी व गाळणी यंत्र) प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल ₹9.90 लाख इतके अनुदान दिले जाणार आहे. या घटकासाठी जिल्ह्याला एक उद्दिष्ट देण्यात आले असून बीआयएस किंवा समकक्ष मानकांचे पालन आवश्यक आहे.
मिनी ऑइल मिल व एक्सपेलर घटकासाठी लाभार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. फिल्टर प्रेससह युनिटसाठी 50 टक्के किंवा कमाल ₹4 लाख, तर फिल्टर प्रेसशिवाय युनिटसाठी 50 टक्के किंवा कमाल ₹3 लाख अनुदान अनुज्ञेय राहील.
पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे कृषी विभागाने कळविले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis