
लातूर, 15 जून (हिं.स.)। शहरातील एका ऑटो रिक्षा चालकास वाहतूक पोलिसांकडून नुकतीच मारहाणीची घटना घडली आहे. या घटनेमुळे रिक्षा चालक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निषेध म्हणून लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाने १७ जून रोजी 'ऑटो रिक्षा बंद' आंदोलनाची घोषणा केली आहे. आटोरिक्षा बंद आंदोलनाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता असून, त्यांना प्रवासासाठी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो.
या आंदोलनाच्या पूर्वतयारी म्हणून, संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात प्रामुख्याने रिक्षा चालकास मारहाण झाल्याच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, घटनेतील सत्य परिस्थिती पडताळून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी आणि रिक्षा चालकांशी सन्मानपूर्वक व कायदेशीर भाषेत वर्तन करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis