वस्तीगृहातून निघून गेलेली दोन मुले पालकांच्या ताब्यात
लातूर, 13 जून (हिं.स.) : महाराष्ट्र पोलीस दलामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ या विशेष मोहिमेंतर्गत हरवलेली, बेपत्ता झालेली तसेच विविध कारणांमुळे घरापासून दूर गेलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास
पोलीस कारवाई


लातूर, 13 जून (हिं.स.) : महाराष्ट्र पोलीस दलामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ या विशेष मोहिमेंतर्गत हरवलेली, बेपत्ता झालेली तसेच विविध कारणांमुळे घरापासून दूर गेलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेदरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत वस्तीगृहातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही मुले काही कारणास्तव वस्तीगृहातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलांच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. परिसरातील विविध ठिकाणी चौकशी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने शोधकार्य वेगाने राबविण्यात आले.

अखंड प्रयत्नांनंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचा शोध लावला. त्यानंतर त्यांची समुपदेशनपूर्वक विचारपूस करण्यात आली. सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलांना सुखरूप परत मिळाल्याने पालकांनी भावूक होत शिवाजीनगर पोलिसांचे आभार मानले.

‘ऑपरेशन शोध-४’ ही मोहीम केवळ हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यापुरती मर्यादित नसून त्यांचे पुनर्वसन, समुपदेशन आणि कुटुंबाशी पुनर्मिलन घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्यदेखील करत आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतेही मूल संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास किंवा हरवलेल्या मुलांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सहकार्यामुळे अशा मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी संवेदनशीलता, तत्परता आणि मानवी दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘ऑपरेशन शोध-४’ अंतर्गत सुरू असलेली मोहीम पुढील काळातही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande