
नवी दिल्ली, 13 जून (हिं.स.)भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा १९ जून रोजी होणाऱ्या दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी होणार नाही. ऑलिम्पिक सुवर्ण आणि रौप्य पदक विजेता असलेला हा खेळाडू सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत असून, त्याने या प्रतिष्ठित स्पर्धेतून माघार घेतली आहे.
नीरज चोप्रा सध्या स्वित्झर्लंडमधील बिएन येथे ४७ दिवसांच्या ऑफ-सीझन प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला आहे. त्याच्यासोबत त्याचे दीर्घकाळचे फिजिओथेरपिस्ट ईशान मारवाह आणि प्रशिक्षक जय चौधरी आहेत. आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांवर लक्ष ठेवून नीरज आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. गेल्या वर्षी, नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिला ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करून ९०.२३ मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तथापि, जर्मनीच्या ज्युलियान वेबरने आपल्या अंतिम प्रयत्नात ९१.०६ मीटर भालाफेक करून ही स्पर्धा जिंकली होती.
नीरजच्या अनुपस्थितीमुळेही, दोहा डायमंड लीगमधील पुरुषांची भालाफेक स्पर्धा अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेचा जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला रोमेश थरंगा पाथिरागे, पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम आणि त्रिनिदाद व टोबॅगोचा विश्वविजेता केशॉर्न वॉलकॉट हे मुख्य आकर्षण असतील. ग्रेनेडाचा माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्स, अमेरिकेचा विश्व कांस्यपदक विजेता कर्टिस थॉम्पसन, केनियाचा अनुभवी ज्युलियस यिगो आणि झेक प्रजासत्ताकचा याकूब हे देखील स्पर्धेत सहभागी होतील.
२३ वर्षीय श्रीलंकन खेळाडू रोमेश थरंगा पाथिरागेने अलीकडेच रोम डायमंड लीगमध्ये ९२.६२ मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून प्रसिद्धी मिळवली. माजी क्रिकेटपटू असलेला पाथिरागे दोहा डायमंड लीगमध्ये प्रथमच सहभागी होत आहे. त्याने सांगितले की, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी स्पर्धा करणे हे त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे आणि दोहामधील परिस्थिती भालाफेकपटूंसाठी अत्यंत अनुकूल आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे