
Maharashtra, 15 जून (हिं.स.) । भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यात शानदार कामगिरी करत इतिहास रचला. दीप्ती शर्माने भेदक गोलंदाजी करत चार षटकांत केवळ १० धावा देऊन पाच बळी घेतले आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानला ६४ धावांनी हरवून स्पर्धेत दणदणीत विजय नोंदवला. तिच्या प्रभावी अष्टपैलू कामगिरीबद्दल दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेऊन, दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा गाठणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. आता तिच्या नावावर भारतासाठी एकूण ३५४ आंतरराष्ट्रीय बळी आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या नावावर आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत ३५५ बळी घेतले होते. दीप्ती आता हा विक्रम करण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे.
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या महिला क्रिकेटपटू
झूलन गोस्वामी - ३५५ बळी
दीप्ती शर्मा - ३५४ बळी
कॅथरीन शीवर-ब्रंट (इंग्लंड) - ३३५ बळी
एलिसे पेरी (ऑस्ट्रेलिया) - ३३२ बळी
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) - ३२७ बळी
सामन्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना दीप्ती शर्मा म्हणाली की, मी खूप आभारी आहे. मला अशा प्रकारच्या खेळपट्ट्या खूप आवडतात आणि याचे सर्व श्रेय संघाला जाते. मला नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये खेळायला आवडले आहे. मला असे वाटते की मी एका मोठ्या मंचावर सुरुवात केली आहे, त्यामुळे या स्पर्धा माझ्यासाठी खास आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे