पुणे - वसतिगृह प्रवेशातील अन्यायाविरोधात दिव्यांग विद्यार्थी रस्त्यावर; १५ जूनला राज्यस्तरीय आंदोलन
पुणे, 13 जून, (हिं.स.)। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली समांतर आरक्षण पद्धत रद्द करून केंद्र शासनाच्या कायद्यानुसार स्वतंत्र ५ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील दिव्यांग विद
पुणे - वसतिगृह प्रवेशातील अन्यायाविरोधात दिव्यांग विद्यार्थी रस्त्यावर; १५ जूनला राज्यस्तरीय आंदोलन


पुणे, 13 जून, (हिं.स.)। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली समांतर आरक्षण पद्धत रद्द करून केंद्र शासनाच्या कायद्यानुसार स्वतंत्र ५ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालयासमोर राज्यस्तरीय अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे.दिव्यांग विद्यार्थी प्रतिनिधी गौरव मालक यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राज्यभरातील मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.सध्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समांतर आरक्षणाची व्यवस्था लागू आहे. मात्र, या पद्धतीमुळे प्रत्येक प्रवर्गातील मर्यादित जागांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परिणामी, अनेक पात्र व गरजू दिव्यांग विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहत असून त्यांच्या शिक्षणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

स्वतंत्र ५ टक्के आरक्षण लागू झाल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या निवास सुविधांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळू शकेल, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने केंद्राच्या कायद्यानुसार तत्काळ निर्णय घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande