ऑस्ट्रेलियन ओपन २०२६: पी. व्ही. सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात
सिडनी, १३ जून (हिं.स.)दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूची ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मधील प्रभावी वाटचाल उपांत्य फेरीतच संपुष्टात आली. महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या विद्यमान विश्वविजेत्या अकाने यामागुचीने तिला २२-२०, २१-१२ असे पराभूत केले.स
पीव्ही सिंधू


सिडनी, १३ जून (हिं.स.)दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूची ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मधील प्रभावी वाटचाल उपांत्य फेरीतच संपुष्टात आली. महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या विद्यमान विश्वविजेत्या अकाने यामागुचीने तिला २२-२०, २१-१२ असे पराभूत केले.सिंधूने सामन्याची जोरदार सुरुवात केली आणि पहिल्या गेममध्ये बहुतांश वेळ आघाडी कायम ठेवली. पण, यामागुचीने सावध पुनरागमन करत सामना 'ड्यूस'पर्यंत नेला आणि अखेरीस पहिला गेम जिंकला.

पहिल्या गेममधील विजयामुळे मिळालेला वेग जपानी खेळाडूने दुसऱ्या गेममध्येही कायम ठेवला. सिंधूने सुरुवातीलाच आघाडी घेतली, परंतु त्यानंतर यामागुचीने सातत्याने गुण मिळवत १८-९ अशी भक्कम आघाडी घेतली. अखेरीस सिंधूचा शॉट नेटमध्ये गेल्याने सामना संपला. सिंधूने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चेन सु-यूला अवघ्या २७ मिनिटांत २१-६, २१-९ असे पराभूत करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.

जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या सिंधूची २०२६ च्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर हंगामातील ही दुसरी उपांत्य फेरी होती. यापूर्वी ती जानेवारीमध्ये मलेशिया ओपनच्या अंतिम चारमध्ये पोहोचली होती. सिंधू या स्पर्धेच्या माध्यमातून सय्यद मोदी इंटरनॅशनल २०२४ नंतरचे आपले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात होती. जरी तिचा विजेतेपदाचा प्रवास तिथेच संपला असला तरी, तिची उपांत्य फेरी गाठणे हे या हंगामात तिच्या सुधारत असलेल्या फॉर्मचे लक्षण मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande