
रत्नागिरी, 15 जून (हिं.स.) । 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेअंतर्गत राज्यभरात राबविण्यात आलेल्या विशेष ई-केवायसी मोहिमेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील ४६ हजार ९६३ महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत.
शासनाने आता ई-केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या अपात्र ठरलेल्या बहिणींना मिळणारा महिना १५०० रुपयांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेसाठी सुरुवातीला एकूण ४ लाख २० हजार ४४० महिलांनी अर्ज केले होते. मात्र छाननी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर ४६ हजार ९६३ लाभार्थी निकषात बसत नसल्याने त्यांना योजनेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या ३ लाख ७३ हजार ५३० इतकी झाली आहे. प्रशासनाने पात्र महिलांना त्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी १० महिन्यांचा पुरेसा वेळ दिला. या काळात अनेक महिलांनी उत्पन्नाचे खोटे दाखले देऊन अर्ज मंजूर करून घेतले होते. मात्र शासनाने आयकर विभाग आणि आरटीओच्या डेटाबेसची पडताळणी केल्याने अनेक अपात्र लाभार्थी समोर आले.
शासनाने खालील त्रुटी व निकषांच्या आधारे लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे :
१. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे,
२. बँक खात्याशी आधार लिंक नसणे,
३. ई-केवायसी पूर्ण न करणे, ४
. अर्जात दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष शासकीय दप्तरातील माहिती यामध्ये तफावत आढळणे.
योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून आतापर्यंत जमा झालेली संपूर्ण रक्कम परत घेतली जाणार आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांकडूनही पूर्ण रकमेची वसुली केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात एकाही पुरुषाने महिलेच्या नावाखाली चुकीचा लाभ घेतलेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी