
लातूर, 15 जून (हिं.स.)।
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या उपस्थित काटगाव येथे शाळा प्रवेशोत्सव; गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम लातूर जिल्ह्यातील काटगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रत्येक बालकाचा समावेश व्हावा आणि शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी, लातूरचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर काटगाव येथील शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानामुळे कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, निसर्गाविषयी प्रेम वाढावे आणि शाळेचा परिसर अधिक हिरवागार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनीही वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
राज्यातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘पहिले पाऊल’ ही अभिनव संकल्पना यंदाच्या प्रवेशोत्सवात राबविण्यात आली. इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन त्याची प्रत पालकांना देण्यात आली. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात जपून ठेवणारी ही संकल्पना पालकांनाही भावली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मांदळे, केंद्रप्रमुख वामन राठोड, शिक्षक विजय माळाळे, गोविंद गारकर, श्रीमती राजमाले, श्रीमती तांदळे, श्रीमती खंडागळे, श्रीमती लांडगे, श्रीमती क्षीरसागर आणि श्रीमती सय्यद उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड म्हणाले की, शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांविषयी आवड निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक व उपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे सातत्याने लक्ष देऊन शिक्षकांशी नियमित संवाद ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
काटगाव येथे साजऱ्या झालेल्या या शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली असून शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास या उपक्रमाची मोठी मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
--------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis