
लातूर, 15 जून (हिं.स.)। एका बाजूला रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णालयांमध्ये जीवन-मरणाची झुंज सुरू असते, तर दुसऱ्या बाजूला रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट अभावी अनेकांना प्राण गमवावे लागतात. या दोन्ही गंभीर सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणारा आगळावेगळा उपक्रम पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन भादा यांच्या वतीने भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.विशाल शहाणे व त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल २५२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रक्तदानासाठी पोलीस अधिकारी अंमलदार तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचविणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्याही जीवाची काळजी घ्यावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे शिबिरातून ‘जीवन देणाऱ्या हाताला जीवनरक्षक भेट’ असा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहोचला.
भादा पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत झालीच, शिवाय वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबतही नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला. समाजहितासाठी पोलीस विभाग केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित नसून सामाजिक जबाबदारी पार पाडण्यातही अग्रभागी आहे. रक्तदान आणि रस्ते सुरक्षा या दोन्ही विषयांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, नागरिकांनीही अशा उपक्रमांचे स्वागत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis