
पुणे, 15 जून (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना महापालिका सभेचे कामकाज समजावे आणि प्रशासनात पारदर्शकता यावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण (लाईव्ह) आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.
सोमवार, १५ जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपाची सत्ता आल्यानंतर सभेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन प्रक्षेपणाची मागणी वाढली होती. त्याची दखल घेत तत्कालीन महापौर रवी लांडगे यांनी आयुक्तांना सभेचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागरिकांना घरबसल्या महापालिका सभेचे कामकाज पाहता येत होते.
या माध्यमातून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांचे समर्थक यांना त्यांच्या लोकप्रतिनिधींची भूमिका, विविध विषयांवरील मते आणि सभेतील सहभाग समजत होता. तसेच कोणता नगरसेवक कोणत्या विषयावर सक्रिय आहे, याची माहितीही थेट नागरिकांपर्यंत पोहोचत होती.
दरम्यान, काही नगरसेवकांनी सभेतील आपल्या भाषणांचे व्हिडिओ आणि सोशल मीडिया रिल्स तयार करून ते प्रसारित करण्यास सुरुवात केली होती. त्यालाही नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत होता.
मात्र, आता अचानक थेट प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या विषयावर महापालिकेतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु