
पिंपरी, 15 जून (हिं.स.)खासगी शाळांसाठी अग्निसुरक्षा नोंदणी आणि अग्नि सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र (फायर सर्टिफिकेट) बंधनकारक असतानाही अनेक शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ६५० शाळांना ई-मेलद्वारे नोटीस पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिका प्रशासनाने संबंधित शैक्षणिक संस्थांना अग्निसुरक्षेच्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून वैध अग्नि सुरक्षितता प्रमाणपत्र प्राप्त करण्यास सांगितले आहे. शहरात सध्या ५४० खासगी आणि ११० महापालिका शाळा अशा एकूण ६५० शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे.
महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेला अग्निशमन विभागाकडून ‘शाळा व्यवसाय अग्नि सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ घेणे अनिवार्य आहे. यासाठी सर्व शाळांना ई-मेलद्वारे सूचना पाठविण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, नियमित देखभाल करणे आणि परवानाधारक एजन्सीकडून आवश्यक प्रमाणपत्र मिळवून ते महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सादर करणे ही संस्थाचालकांची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने सर्व शैक्षणिक संस्थांना निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु