
पुणे, 15 जून (हिं.स.)पुणे जिल्ह्यातील शेतीसह पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा चिंताजनक घट झाली आहे. त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला विलंब होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ४.३१ टीएमसी म्हणजे १४.८० टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ५.२० टीएमसी म्हणजे १७.८४ टक्के होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास एक टीएमसीने कमी पाणी उपलब्ध असल्याचे चित्र समोर आले आहे.
मान्सूनच्या प्रारंभी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही परिणाम दिसून येत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढलेली नाही. त्यामुळे आगामी काळात पाऊस कमी राहिल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि जलनियोजनासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.यामुळे प्रशासनासह नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून आगामी काही आठवड्यांतील पावसावर परिस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु