स्मार्ट मीटर सक्तीवर पुणेकरांचा संताप; महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुणे, 15 जून (हिं.स.)कोणतीही तक्रार नसताना सुरळीत सुरू असलेले वीज मीटर बदलून त्यांच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम महावितरणने वेगाने सुरू केल्याने पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मीटर व्यवस्थित कार्यरत असताना ते बदलण्याची आवश्यकता काय,
स्मार्ट मीटर सक्तीवर पुणेकरांचा संताप; महावितरणच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


पुणे, 15 जून (हिं.स.)कोणतीही तक्रार नसताना सुरळीत सुरू असलेले वीज मीटर बदलून त्यांच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम महावितरणने वेगाने सुरू केल्याने पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मीटर व्यवस्थित कार्यरत असताना ते बदलण्याची आवश्यकता काय, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

महावितरणकडून ग्राहकांच्या मोबाईलवर १७ ऑगस्ट २०२१ च्या राजपत्र अधिसूचनेचा संदर्भ देत संदेश पाठविण्यात येत आहेत. या संदेशानुसार ४८ तासांनंतर विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांच्या संमतीशिवाय ही प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.अचूक बिलिंग, मोबाईल ॲपद्वारे वापराची माहिती आणि सौरऊर्जा वापरासंदर्भातील सुविधा यांसारखे फायदे सांगितले जात असले तरी या डिजिटल व्यवस्थेच्या पारदर्शकतेबाबत अनेक ग्राहक साशंक आहेत.मीटर बदलण्याची प्रक्रिया विनामूल्य असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत असला, तरी भविष्यात प्रीपेड वीज व्यवस्था लागू करून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

तांत्रिक बिघाड, वीज चोरी किंवा ग्राहकांकडून कोणतीही तक्रार नसताना सरसकट सर्वच घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय नेमका कोणाच्या फायद्यासाठी घेतला जात आहे, असा सवाल ग्राहक संघटनांनी उपस्थित केला आहे. यामुळे स्मार्ट मीटर धोरणाबाबत जनजागृती, पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande