शैक्षणिक क्षेत्रात ‘पीजीआय’ क्रमवारीत रत्नागिरी जिल्हा राज्यात तिसरा
रत्नागिरी, 15 जून (हिं.स.) । केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या ''परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स'' (PGI) अहवालात रत्नागिरी जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढाव
शैक्षणिक क्षेत्रात ‘पीजीआय’ क्रमवारीत रत्नागिरी जिल्हा राज्यात तिसरा


रत्नागिरी, 15 जून (हिं.स.) । केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स' (PGI) अहवालात रत्नागिरी जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेणाऱ्या या मानांकनात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. रत्नागिरीसोबतच शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही तितकीच प्रभावी कामगिरी करत संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे.

केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या मूल्यांकनात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यांसाठी असलेल्या ६०० गुणांच्या निकषांवर आधारित या यादीत कोल्हापूर जिल्ह्याने ४६३ गुणांसह प्रथम, तर सातारा जिल्ह्याने ४०४ गुणांसह द्वितीय स्थान मिळवले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांनी प्रत्येकी ३७७ गुण मिळवत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

देश पातळीवर राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात एकूण १००० गुणांच्या आधारे राज्यांचे, तर ६०० गुणांच्या आधारे जिल्ह्यांचे मूल्यांकन केले जाते. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती आणि दर्जा, वर्गखोल्या, वीज आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शाळा गळतीचे प्रमाण रोखणे, शाळांमधील स्वच्छतागृहांची व आरोग्याची सोय, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शालेय व्यवस्थापन समितीची कार्यक्षमता या प्रमुख निकषांवर मूल्यांकन केले जाते.

देश पातळीवरील शैक्षणिक स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सातवे स्थान मिळवून आपली प्रगती कायम ठेवली आहे. राज्याला या मानांकनापर्यंत पोहोचवण्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या योगदानाचे कौतुक होत आहे.

या निकालांमुळे कोकणातील शैक्षणिक दर्जा किती उच्च आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून शिक्षक आणि प्रशासनासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande