
सोलापूर, 15 जून (हिं.स.)।
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत सोलापूरजवळील टिकेकरवाडी रेल्वे स्थानकावरील यार्डचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. नियोजित ट्रॅफिक ब्लॉकच्या कालावधीत विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, गतिमान आणि कार्यक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेऊन स्थानकाच्या यार्डमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या. सोलापूर विभागातील विविध विभागांच्या समन्वयातून हे काम वेळेत पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पासाठी परिचालन, अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार, ट्रॅक्शन आणि विद्युत विभागातील ३६८ हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे श्रेणीसुधारणा यशस्वीपणे पूर्ण झाल्या.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या आधुनिकीकरणामुळे गाड्यांच्या वेळपालनात सुधारणा होणार असून प्रवासी तसेच मालवाहतूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे.
कामाच्या अंमलबजावणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यामध्ये युनिमॅट ट्रॅक टॅम्पिंग मशिन्स, रेल क्रेन, हायड्रॉलिक ट्रॅक जॅक, ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (ओएचई) कामांसाठी विशेष उपकरणे आणि टॉवर वॅगन्सचा समावेश होता. तसेच सुरक्षा आणि समन्वयासाठी वॉकी-टॉकी, क्रँक हँडल्स आणि विशेष क्लॅम्प्सचा वापर करण्यात आला.
टिकेकरवाडी रेल्वे स्थानकावरील हे आधुनिकीकरण सोलापूर विभागाच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, त्याचा दीर्घकालीन लाभ प्रवासी आणि मालवाहतूक क्षेत्राला मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड