
परभणी, 19 जून (हिं.स.)। राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पल्स पोलिओ कार्यबल समितीची बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी कार्य करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात एकूण १,६२३ पोलिओ बुथ राहणार असून २ लाख १९ हजार ८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी संजयकुमार पांचाळ यांच्या प्रमुख नियंत्रणाखाली मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, आरएमओ डॉ. कल्याण कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रेखा कदम, माध्यमिक शिक्षण अधिकारी किशनलाला गुर्जर, खाजगी वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल खळीकर, पोलीस विभाग, महावितरण, रेल्वे, परिवहन, तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, लसीकरण पर्यवेक्षक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी केंद्रांवर जनजागृती सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, बाजारपेठ परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करणे, बसस्थानकांवर ट्रान्झिट बुथ उभारणे तसेच अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विटभट्ट्या, बांधकाम स्थळे, स्थलांतरित वस्त्या, दुर्गम पाडे आणि इतर जोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष सर्वेक्षण राबविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमधील बालकांपर्यंतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.*जवळच्या पोलिओ बुथवर बालकांना लस पाजावी*‘दोन थेंब पोलिओचे, आरोग्याच्या सुरक्षेचे’ या ब्रीदवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना २८ जून रोजी जवळच्या पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis