
पनवेल , 19 जून,(हिं.स.)। ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर महाराष्ट्र शासनाने बदललेली शहरांची नावे अद्ययावत करणे तसेच प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वाहतुकीवर प्रभावी बंदी लागू करण्याबाबत चर्चा, सूचना आणि कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक मंगळवार, दि. 23 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता खारघर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील सर्व वाहतूकदार, कुरिअर प्रतिनिधी तसेच बुकिंग एजन्सी धारकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर केले आहे. त्यामुळे सर्व प्रवासी वाहतूकदार आणि बुकिंग एजन्सींनी त्यांच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये ही नवीन नावे तातडीने अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात येणार आहे.
याशिवाय, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन सिंथेटिक मांजाच्या उत्पादन, विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहतूकदार आणि कुरिअर एजन्सींनी अशा प्रतिबंधित मांजाची वाहतूक होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी व उपाययोजना कराव्यात, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित घटकांनी बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)