
अकोला, 02 जून (हिं.स.) :गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील घाटाची आवश्यक दुरूस्ती, तसेच स्वच्छताकामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिले.ऑगस्ट महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या कावड उत्सवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी गांधीग्राम येथील कावड घाट परिसराची पाहणी केली. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपविभागीय अधिकारी डॉ. राजेश जावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राजेश भारती, पप्पू मोरवाल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, कावड उत्सवानिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर पुरेशी वीज व्यवस्था, स्वच्छता करावी. घाटावरील तुटलेले हौद त्वरित दुरुस्त करावे. भाविकांना पूर्णेचे पाणी कावडीत सुरक्षितपणे घेण्यासाठी पुरेशा खोलीपर्यंत पायऱ्या असाव्यात. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प व्यवस्था करावी. ही कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.
घाट परिसरात वाहनतळ व इतर आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे