अकोला : फरार आरोपींच्या अटकेसाठी महिलांचा मोर्चा
अकोला, 02 जून (हिं.स.)। अलंकार मार्केट परिसरात झालेल्या राहुल उर्फ दादु कालु सारसार यांच्या निर्घृण खूनप्रकरणातील फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) कार्यालयावर मोर्चा काढत न
Photo


अकोला, 02 जून (हिं.स.)। अलंकार मार्केट परिसरात झालेल्या राहुल उर्फ दादु कालु सारसार यांच्या निर्घृण खूनप्रकरणातील फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) कार्यालयावर मोर्चा काढत न्यायाची जोरदार मागणी केली. “मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा देत महिलांनी पोलिसांच्या तपासातील कथित दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मृतकाच्या कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

राहुल उर्फ दादु कालु सारसार यांची १५ मे रोजी अलंकार मार्केट परिसरातील राज मंदिर बारजवळ धारदार शस्त्रे व इतर हत्यारांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात अनेक आरोपींविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवसांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही केवळ काही आरोपींनाच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

मोर्चादरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. मृतकाची आई सौ. कविता कालु सारसार यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, तपास यंत्रणा गुन्ह्याचा तपास अपेक्षित वेगाने करीत नसल्याची तक्रार केली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमावे तसेच तपासात पारदर्शकता ठेवून कुटुंबीयांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

निवेदनात खुनासाठी वापरण्यात आलेल्या मूळ शस्त्रांच्या जप्तीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात सक्षम दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित महिलांनी आरोपींना अभय देण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. फरार आरोपींना त्वरित अटक करून तपासाला गती न दिल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

मोर्चानंतर शिष्टमंडळाने एसडीपीओ कार्यालयात निवेदन सादर केले. संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande