
अकोला, ०२ जून (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने आयोजित ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ ही राज्यभरात ३१ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, या यात्रेचे आगमन ९ जून रोजी अकोला शहरात होणार आहे.
गोमातेचे सांस्कृतिक, धार्मिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, देशी गोवंशाचे संवर्धन आणि गोसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. तसेच गोआधारित शेतीचा प्रसार, गोशाळांना आत्मनिर्भर बनविणे, गोबर व गोमूत्रापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती देणे, आणि शासनाच्या पशुसंवर्धन योजनांचा प्रचार-प्रसार करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत गोशाळा संचालकांसोबत आढावा बैठका, पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमधील समन्वय, पोलीस प्रशासन व गोरक्षक यांच्यातील सहकार्य वाढविणे तसेच संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायद्याबाबत जनजागृती करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ही यात्रा पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथून सुरू होऊन अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांतून प्रवास करत १४ जून रोजी नागपूर येथे संपन्न होणार आहे.
अकोल्यात ९ जून रोजी होणाऱ्या आगमनावेळी विविध जनजागृती कार्यक्रम आणि गोसंवर्धन विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे