
रुग्णवाहिका बेपत्ता असल्याचा आरोप, युवकांचे आंदोलन
अकोला, ०२ जून (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता आणि वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचबरोबर गेल्या १२ ते १३ दिवसांपासून 108 रुग्णवाहिका रुग्णालयातून गायब असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठप्प असून अनेक ठिकाणी पंखे बंद आहेत. कुलरमध्ये पाणी नसल्याने रुग्णांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शौचालयांमध्येही पाण्याची सुविधा नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना अकोला किंवा इतर ठिकाणी हलवताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने गरीब रुग्णांवर आर्थिक ताण वाढत आहे.
या परिस्थितीविरोधात बजरंग चौक परिसरातील युवकांनी पुढाकार घेत रुग्णांना थंड पाण्याचे वाटप केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात माजी नगरसेवक मंगेश सोळंके, नगरसेवक रुपेश चव्हाण यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलकांनी प्रशासनाकडे तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता सुधारणा, बंद पंखे व कुलर सुरू करणे तसेच 108 रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील या गंभीर समस्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून प्रशासन याकडे किती वेगाने आणि गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे