
चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागामार्फत चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार यांनी उपस्थित नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विषयतज्ज्ञांना आपले अभिप्राय संवेदनशीलतेने नोंदविण्याचे आवाहन केले. एकल महिलांच्या समस्या आणि त्यांच्या भावनिक तसेच सामाजिक अडचणी समजून घेऊन धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अॅड. दक्षिणा जुनगरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मिनाक्षी भस्मे यांनी एकल महिला धोरणाची उद्दिष्टे आणि अपेक्षित अभिप्राय याबाबत माहिती दिली. बैठकीत उपस्थित एकल महिलांनी तसेच संस्थांच्या प्रतिनिधींनी पुनर्विवाह, रोजगार, कौशल्य विकास, मुलांचे शिक्षण आणि सामाजिक सुरक्षितता यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
या सूचनांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, प्रस्तावित धोरणात त्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले.
बैठकीची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन मोरेश्वर झोडे यांनी केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव