चंद्रपूरमध्ये ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ कार्यक्रम; 32 युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण
चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देशभरातील लाभार्थ्यांना
चंद्रपूरमध्ये ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ कार्यक्रम; 32 युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण


चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देशभरातील लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला महापौर संगिता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, या योजनेत नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाते, जे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. चंद्रपूरचा उत्पादन आणि खाणकाम क्षेत्र म्हणून होणारा विकास लक्षात घेता ही योजना स्थानिक उद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात आतापर्यंत 1609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमादरम्यान नियोक्त्यांच्या माध्यमातून नव्याने रुजू झालेल्या 32 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही केवळ आर्थिक योजना नसून, युवकांच्या आकांक्षा आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील मजबूत दुवा आहे. देशात आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याचा तसेच लाखो युवकांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

ही योजना युवकांच्या परिश्रमांना मान्यता देणारी असून भारताच्या रोजगार व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande