
चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत उपक्रमांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आणि तळागाळातील सहभाग वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांमध्ये 23 ते 25 जून 2026 या कालावधीत या ग्रामसभा होणार आहेत. संबंधित गावांतील जास्तीत जास्त नागरिकांनी या ग्रामसभांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या ग्रामसभांमध्ये प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची उद्दिष्टे आणि घटकांची माहिती देणे, अनुसूचित जातींच्या गावांच्या विकास गरजांची ओळख करून प्राधान्यक्रम ठरवणे, तसेच सामुदायिक सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
याशिवाय उपजीविका, शिक्षण आणि कौशल्य विकास योजनांतील पात्र लाभार्थ्यांची ओळख, सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा आणि विविध केंद्र व राज्य योजनांशी समन्वय यावरही चर्चा होणार आहे. ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक 50 सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि 15 पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे नियोजनही या बैठकीत मांडले जाणार आहे.
ग्रामसभेत संबंधित शासन निर्णय वाचून दाखविणे, बेसलाईन स्कोर समजावून सांगणे तसेच निधी वापराचा आढावा घेणे यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
या प्रक्रियेत ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, पोलिस पाटील, शिक्षक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बँक सखी आणि सीएससी केंद्र चालक आदींचा सहभाग असणार आहे.
संबंधित गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव