आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विदर्भातील उद्योगांचे होईल ‘टेक-ऑफ’- नितीन गडकरी
नागपूर ‘पॅसेंजर आणि कार्गो हब’ म्हणून विकसित होणार नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला असून, या विमानतळामुळे विदर्भातील पर्यटन, खाणकाम, उद्योग आणि निर्
नागपूर विमानतळ हस्तांतरण कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


नागपूर ‘पॅसेंजर आणि कार्गो हब’ म्हणून विकसित होणार

नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आज पूर्ण झाला असून, या विमानतळामुळे विदर्भातील पर्यटन, खाणकाम, उद्योग आणि निर्यात क्षेत्राला नवी गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

नागपूर शहराला विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून औद्योगिक आणि कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जीएमआर एरो कंपनीकडे हस्तांतरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘नागपूर देशाच्या मध्यवर्ती विकास केंद्राकडे’

कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर हे देशाचे ‘झिरो माईल’ शहर असून येथून सव्वातासाच्या हवाई अंतरावर देशातील चार प्रमुख महानगरे आहेत. उत्कृष्ट रस्ते, आधुनिक रेल्वे स्थानके, मेट्रो नेटवर्क आणि विकसित होत असलेली लॉजिस्टिक व्यवस्था यामुळे नागपूर देशातील महत्त्वाचे वाहतूक आणि औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.ते म्हणाले की, ताडोबा, पेंच आणि उमरेड परिसरातील व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. महाराष्ट्रातील सुमारे 75 टक्के खनिजसंपत्ती विदर्भात आहे. त्यामुळे पर्यटन आणि खाण उद्योगाच्या विस्तारासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

सिंगापूर आणि दुबईसाठी थेट हवाई सेवेची मागणी

गडकरी यांनी नागपूरहून सिंगापूर आणि दुबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे केली. यामुळे विदर्भातील उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी थेट जोडणी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.नागपूरच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या संत्र्यांची ओळख अधिक प्रभावीपणे जगापर्यंत पोहोचावी यासाठी विमानतळावर ‘संत्रा बर्फी’ विक्री केंद्र सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

‘एरोट्रोपोलिस’ म्हणून नागपूरचा विकासकेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत नागपूर विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास १० लाखांनी वाढली आहे. नव्या व्यवस्थापनाखाली विमानतळाची वार्षिक क्षमता ६० लाखांहून अधिक प्रवाशांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.“एमआरओ सुविधा, कार्गो हब आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूर विमानतळ संपूर्ण आर्थिक क्षमतेने विकसित होईल. भविष्यात नागपूर ‘एरोट्रोपोलिस’ अर्थात विमानतळ-आधारित महानगर म्हणून देशाच्या नकाशावर नवे स्थान निर्माण करेल,” असे त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या आर्थिक विकासाला चालनाविमानतळाच्या विस्तारामुळे कृषी उत्पादनांची निर्यात, औद्योगिक मालवाहतूक, पर्यटन व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे नागपूर आणि संपूर्ण विदर्भ प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande