नागपूर ‘डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनणार- मुख्यमंत्री
- नागपूर विमानतळाच्या विकासासाठी नवे पर्व - वार्षिक 3 कोटी प्रवाशांची क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दुसरी धावपट्टी भविष्यात नागपूरला देशातील महत्त्वाचे ‘डिफेन्स एव्ह
नागपूर विमानतळ हस्तांतरण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- नागपूर विमानतळाच्या विकासासाठी नवे पर्व - वार्षिक 3 कोटी प्रवाशांची क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट

नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दुसरी धावपट्टी भविष्यात नागपूरला देशातील महत्त्वाचे ‘डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून विकसित करण्यास मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.नागपूर विमानतळाचे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर जीएमआर समूहाकडे हस्तांतरण करण्यात आल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या हस्तांतरणासाठी पार पडलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीमुळे प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.नागपुरातील भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडसह विविध संरक्षण आस्थापनांच्या उपस्थितीमुळे येथे एव्हिएशन उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. दुसऱ्या धावपट्टीमुळे संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादन उद्योगांना चालना मिळणार असून नागपूर हे संरक्षण विमाननिर्मिती क्षेत्राचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असे त्यांनी नमूद केले.तसेच हे विमानतळ केवळ नागपूरपुरते मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारताच्या आर्थिक विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांना मोठी गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

हस्तांतरणाच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण

कार्यक्रमादरम्यान मिहान इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वीपीन इटनकर आणि जीएमआर एअरोचे अध्यक्ष जी. व्ही. एस. राजू यांच्यात विमानतळ हस्तांतरणासंदर्भातील कागदपत्रांची औपचारिक देवाण-घेवाण करण्यात आली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विमानतळासाठी नव्या युगाची सुरुवात

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) जमिनीचा भाडेपट्टा कालावधी 6 ऑगस्ट 2029 नंतरही वाढविण्यात आल्याने नागपूर विमानतळाच्या विकासासाठी महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे विमानतळाचे संचालन जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमार्फत पुढील ३० वर्षांच्या सवलत कालावधीसह करण्यात येणार असून, भविष्यातील विस्तार आणि आधुनिकीकरणाला चालना मिळणार आहे.खासगी क्षेत्राची कार्यक्षमता आणि सरकारी देखरेखीच्या समन्वयातून विमानतळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, आधुनिक सुविधा आणि सुधारित प्रवासी व मालवाहतूक सेवा विकसित केल्या जातील. हा प्रकल्प भारत सरकारच्या विमान वाहतूक क्षेत्रातील भक्कम पायाभूत सुविधा उभारणीच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

वार्षिक 3 कोटी प्रवाशांची क्षमता

जीएनआयएएलकडून विमानतळाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असून, भविष्यात वार्षिक 3कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर विमानतळाला मध्य भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नवे स्थान प्राप्त होईल.या विकासामुळे विदर्भातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार असून, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळेल. मालवाहतूक क्षमतेतही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande