नागपूर विमानतळ ‘एरोट्रोपोलिस’ म्हणून विकसित होणार - के. राममोहन नायडू
- प्रवासी क्षमता 60 लाखांहून अधिक वाढणार - नागपूर विमानतळाचे जीएमआरकडे हस्तांतरण नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ भविष्यात ‘एरोट्रोपोलिस’ अर्थात विमानतळ-आधारित महानगर म्हणून विकसित होणार असून, एमआरओ (मेंटेनन्स, रिप
के. राममोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री


- प्रवासी क्षमता 60 लाखांहून अधिक वाढणार

- नागपूर विमानतळाचे जीएमआरकडे हस्तांतरण

नागपूर, 25 जून (हिं.स.) : नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ भविष्यात ‘एरोट्रोपोलिस’ अर्थात विमानतळ-आधारित महानगर म्हणून विकसित होणार असून, एमआरओ (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) आणि कार्गो हबच्या माध्यमातून ते आपल्या संपूर्ण आर्थिक क्षमतेने कार्यरत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारप्पू राममोहन नायडू यांनी केले.

नागपूरच्या विमानतळाचे जीएमआर एअरपोर्टस लिमीटेड या कंपनीकडे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हस्तांतरण करण्याचा कार्यक्रम आज, गुरुवारी नागपुरात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राम मोहन नायडू म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत नागपूर विमानतळाची प्रवासी क्षमता सुमारे 10 लाखांनी वाढली आहे. नव्या व्यवस्थापनामुळे ही क्षमता दरवर्षी 60 लाखांहून अधिक प्रवाशांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागपूर हे विमान वाहतूक, उद्योग, व्यापार आणि निर्यात क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.

कार्गो हबमुळे निर्यातीला चालना

विदर्भातील संत्रा उत्पादन, हातमाग उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या जागतिक बाजारपेठेतील विपणनासाठी कार्गो हब उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. यामुळे कृषी आणि औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला नवे दालन खुले होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या बांधकाम परवानगी प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ती अधिक ग्राहकाभिमुख आणि व्यापारसुलभ केली जाईल. यासंदर्भात आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले जातील, ज्याचा फायदा बांधकाम क्षेत्रालाही होईल, असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या हस्ते नागपूर विमानतळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन आणि खाणकाम क्षेत्राच्या विकासासाठी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच नागपूरहून सिंगापूर आणि दुबई या शहरांसाठी थेट हवाई सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे केली.याशिवाय, विमानतळावर विदर्भाची खास ओळख असलेल्या ‘संत्रा बर्फी’च्या विक्रीसाठी स्टॉल उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande